DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खडसेंच्या फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी?

सखोल चौकशीसह कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी

जळगाव : माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पक्षाच्या म्हणण्यानुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोन फिरत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. सुरक्षारक्षकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खडसे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचे पक्षाने सांगितले.

दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. ड्रोनद्वारे झालेल्या निगराणीची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, वाय. एस. महाजन, सुनील माळी, मजहरभाई पठाण, रमेश बारे, विनायक पाटील, गौरव वाणी, गिरीश सांगळे, किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, नईम खाटीक, रफीक पटेल आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.