पवारांवर वादग्रस्त पोस्ट, अभिनेत्री केतकीवर गुन्हा दाखल
अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘पवारांना’ उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर आता या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे केतकीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केतकीच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावरही तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
“ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू…”; पवारांना उद्देशून केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट
केतकी विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात दाखल तक्रारीत म्हटले आहे की, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्तीच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केली. यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
काय आहे केतकीची पोस्ट
केतकी चितळेने यावेळी लिहीताना सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहेत. केतकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll” अशा शब्दातील एक कविता शेअर केलेली आहे. अॅडव्होकेट नितीन भावेंनी ही कविता लिहील्याचं म्हटलं आहे.