‘त्या’ जागेवरुन खा.उन्मेष पाटील आणि आ.मंगेश चव्हाण यांच्यात मतभेद ; नेमकं काय आहे प्रकरण?
चाळीसगाव – चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना फोन करुन जाब विचारला आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी संवाद साधलेले ऑडिओ क्लिप खासदारांच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून व्हायरल करण्यात आलं आहे. कारण नसताना आमदार मंगेश चव्हाण मला प्रकरणात इन्व्हॉल करताय, असा आरोप भाजप खासदारांनी केलाय.
“आमदार मंगेश चव्हाण यांनी मी आणि ते सोबत येऊन तुमच्याशी व्यवहार केला, असा व्हिडिओ तुमच्याकडून तयार केला आहे. मी आणि मंगेश चव्हाण आपल्याकडे व्यवहारासाठी एकत्र कधीही आलो नाही. असा आपण लवकरात लवकर खुलासा करा, अन्यथा मी पत्रकार परिषद घेईल”, असा इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी फोनवरुन सुरेश जैन यांना दिलाय.
आमदार मंगेश चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संबंधित जागेबाबत सुरु असलेल्या वादावर भूमिका मांडली होती. त्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांचा एक ऑडिओ क्लिप समोर आलाय.
मंगेश चव्हाण पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले होते?
“सुरेश दादा जैन आणि मी जी जागा विकत घेऊन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेली आहे त्यावरुन काही लोकं डोळ्यावर थोडं पिवळंपण आल्यासारखं, कावीळ झाल्यासारखं वागत धादांत चुकीचे आरोप करत आहेत, सुप्रीम इंडस्ट्रीजचा मालक कोण ते जाहीर करा, असं आव्हान देत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतोय”, असं मंगेश चव्हाण म्हणाले होते.
“सुप्रीम इंडस्ट्रीजचा सर्वस्वी आमदार मंगेश चव्हाण आहे. माझ्या परिवारातील तिथे सर्व भागिदारी आहेत. व्यवसाय, व्यापार करणं गुन्हा नाही. मी आमदार होण्याआधीच तो व्यवसाय आहे. ती जमीन बळकवलेली नाही. जमीन मालकाकडून ती जमीन आम्ही विकत घेतलेली आहे. मी त्यावेळेस आमदार नसताना जमीन घेतली याचे सर्व कागदपत्रे आहेत”, असं मंगेश चव्हाण म्हणाले.