पाळधीत दंगल: लाखोंचे नुकसान, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वाहनाचा कट लागल्यावरून झालेल्या वादातून दंगल भडकली. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. दंगलीत तब्बल ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने व ४ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २०-२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादातून जातीय तणाव व जाळपोळ
माहितीनुसार, गावात वाहनाचा कट लागल्यामुळे वाद निर्माण झाला. हा वाद पुढे जातीय स्वरूप घेत गेला. संतप्त जमावाने दुकाने व वाहनांवर दगडफेक करत आग लावली. या घटनेमुळे गावात भीतीचे व तणावाचे वातावरण आहे.
दुकाने व वाहनांचे मोठे नुकसान
घटनेत झालेल्या नुकसानीचा आढावा:
- यासीर अमित देशमुख: मोबाईल दुकानातून १.५ लाखांचे मोबाईल चोरीला.
- जावेद पथरू पिंजारी: चप्पल दुकान जळून ८ लाखांचे नुकसान.
- शेख हबीब शेख शरीफ: पानसेंटर जळून २.३० लाखांचे नुकसान.
- वकार अहमद शेख शकील: दुचाकी व घराचे ५ हजारांचे नुकसान.
- फारुक शेख शरीफ: इलेक्ट्रिक दुकान जळून ५ लाखांचे नुकसान.
- एजाज युसूफ देशमुख: ऑटो पार्ट्स दुकानातून ३ लाखांचे साहित्य चोरीला.
- दानिश शेख सत्तार: रेफ्रिजरेटर दुकानाचे १० लाखांचे नुकसान.
- शेख साबीर शेख सादिक: मोबाईल व एलसीडी दुकान २ लाखांचे नुकसान.
- अक्रम खान अन्वर खान: अंड्यांचे ४० हजारांचे नुकसान.
- रफिक खान अन्वर खान: हातगाडीचे ३ हजारांचे नुकसान.
- शेख तसव्वर शेख हमीद: ४ वाहने जळून १० लाखांचे नुकसान.
गुन्हा दाखल व तपास सुरू
या प्रकरणाची तक्रार जावेद पथरू पिंजारी (वय ४०, रा. बागवान मोहल्ला, पाळधी) यांनी पाळधी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात २०-२५ जणांविरुद्ध दंगली, तोडफोड व जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगावचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत. घटनेमुळे पाळधी गावात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना कडक केल्या आहेत.