मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची घंटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा राजकीय रंगाने अधिकच गडद झाला आहे. सत्तेच्या हंडीसाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबग, यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचं स्वरूप अधिकच स्पर्धात्मक झालं आहे. पावसाच्या सरींसोबतच राजकीय टोलेबाजी व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असून, आम्ही विकासाची हंडी लावणार आहोत,” असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं.
परिवर्तनाची दहीहंडी
वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपातर्फे आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी’ सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाले. छावा चित्रपटातील दृश्यांवर आधारित मानवी मनोरे रचून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. त्याचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक करताना सांगितलं, “महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे. आता विकासाची हंडी लावून त्यातील लोणी जनतेपर्यंत पोहोचवू.”
लोणी कुणी खाल्लं?
महापालिकेतील लोणी कुणी खाल्लं, असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी थेट नावं न घेता उत्तर दिलं. ते म्हणाले, “इतकी वर्ष लोणी कुठं जात होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. जनतेला सत्य माहिती आहे.”
त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, “सण-उत्सवांवरील बंधनं आधी एकनाथ शिंदे आणि नंतर मी हटवली. त्यामुळे गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असला तरी गोविंदांचा उत्साह त्याहून अधिक आहे.”