पावसामुळे शिक्षण ठप्प! अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने उद्यासाठी काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व येलो अलर्ट दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक जिल्ह्यांत शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा : पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड व सातारा या सहा तालुक्यांतील शाळांना 20 आणि 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड (पनवेल महानगरपालिका क्षेत्र) : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील सर्व सरकारी-खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व प्रशिक्षण केंद्रे 20 ऑगस्ट रोजी बंद राहतील.
ठाणे व पालघर : दोन्ही जिल्ह्यांत उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्याने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेने शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी दिली असून नागरिकांनी घराबाहेर विनाकारण न पडण्याचे आवाहन केले आहे.
सांगली : पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुके आणि सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा इमारतींचा वापर निवारा केंद्रांसाठी केला जाईल, असेही सांगितले.