DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

देशातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा रेल्वे ट्रॅक प्रकल्प वाराणसीत सुरू

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत, भारतीय रेल्वेने देशातील पहिला सौरऊर्जेवर आधारित ट्रॅक प्रकल्प सुरू करून हरित उर्जेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) येथे सुरू झालेल्या या प्रायोगिक उपक्रमामुळे रेल्वे वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जा यांचा संगम घडला आहे.

या प्रकल्पांतर्गत 70 मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकमध्ये 28 स्वदेशी सौर पॅनेल्स बसवण्यात आले असून, एकत्रितपणे 15 किलोवॉट पीक क्षमतेची वीज निर्माण होते. विशेष म्हणजे, ट्रॅकमध्ये पॅनेल्स बसवले तरी रेल्वे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होत नाही.

तांत्रिक वैशिष्ट्ये

  • प्रकार : बायफेशियल मोनो-क्रिस्टलाइन PERC सेल्स (दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश शोषण्याची क्षमता)

  • पॅनेल आकार : 2278 मिमी × 1133 मिमी × 30 मिमी

  • वजन : 31.83 किलो

  • उत्पादन क्षमता : प्रत्येकी 602 Wp

  • कार्यक्षमता : 20-21%

  • ऊर्जा घनता : 240 KWp प्रति किमी

  • 1 किमी ट्रॅकमधून ऊर्जा उत्पादन : दररोज सुमारे 960 युनिट्स

अभिनव डिझाईन

परंपरागत सौर प्रकल्प छतांवर किंवा मोकळ्या जागेत बसवले जात असतात. परंतु BLW ने रेल्वे ट्रॅकदरम्यान पॅनेल्स बसवण्याची संकल्पना साकारली. रबर माउंटिंग पॅड्स व इपॉक्सी अ‍ॅडहेसिव्हद्वारे हे पॅनेल्स सुरक्षित ठेवले गेले आहेत. फक्त 90 मिनिटांत हे पॅनेल्स काढून पुन्हा बसवता येतात, त्यामुळे देखभाल करणे सुलभ झाले आहे.

पर्यावरणपूरक आणि आर्थिक लाभ

BLW नुसार, जर हा प्रकल्प देशभरातील निष्क्रिय ट्रॅक्स व यार्ड लाइन्सवर राबवला गेला, तर दरवर्षी प्रति किमी 3.21 लाख युनिट्स वीज निर्मिती होऊ शकते. सुमारे सात वर्षांत गुंतवणूक परत मिळेल आणि त्यानंतर अनेक वर्षे स्वस्त व स्वच्छ वीज उपलब्ध राहील.

अधिकाऱ्यांचे मत

BLW चे जनसंपर्क अधिकारी राजेश सिंह यांनी सांगितले की, “देशात पहिल्यांदाच रेल्वे ट्रॅकमध्ये सौर पॅनेल्स बसवले गेले आहेत. ही संपूर्ण प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, देशभरातील रेल्वे मार्ग सौरऊर्जेने उजळवण्याची क्षमता यात आहे.”

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.