“हॉटेल्स बंद, पाणी-जेवणाची सोय नाही; सरकार इंग्रजांपेक्षा क्रूर” – मनोज जरांगे यांची टीका
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू असलेल्या मनोज जरांगे यांना पोलिसांनी दिलेल्या परवानगीची मुदत संपल्याने पुन्हा एक दिवसासाठी ती वाढवण्यात आली आहे. मात्र दिवसभराच्या घडामोडींनंतर पोलिसांनी आणखी काही कडक अटी-शर्ती लागू केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला उत्तर देताना ते म्हणाले –
“सरकारने आता डावपेच न खेळता थेट आरक्षण द्यावे. गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळाले तर समाज मरेपर्यंत विसरणार नाही. तुम्ही एक-एक दिवस मुदत वाढवली तरी आमचे उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.”
ते पुढे म्हणाले –
“सरकारकडे परवानगी देण्याची ताकद आहे, तसेच लोकांना अडवणे किंवा गोळ्या घालून मारण्याचीही सत्ता आहे. आमच्या आंदोलन स्थळी टॉयलेट्स बंद करण्यात आले आहेत, हॉटेल्सवर कुलुपं लावली आहेत, पाणी-जेवणाची सोय थांबवली आहे. अशा कृतींनी तुम्ही इंग्रजांपेक्षाही बेकार व क्रूर वाटत आहात.”
जरांगे यांनी सरकारवर ‘भंगार खेळ’ खेळत असल्याचा आरोप करत स्पष्ट मत नोंदवलं –
“एक दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी थेट आरक्षण जाहीर करावं. मराठा समाजाचं मन जिंकण्याची हीच वेळ आहे. सरकारने गरीबांच्या लेकरांना आरक्षण दिल्यास समाज कधीच विसरणार नाही.”
त्यांनी इशारा दिला की, मराठा समाजाच्या तरुणांना त्रास दिला नाही तर तेही शांततेने राहतील. परंतु पाणी, अन्न, शौचालय यासारख्या मुलभूत सुविधा बंद करून आंदोलकांना कंटाळवून मुंबई सोडायला लावण्याचा डाव सरकारकडून रचला जात आहे.