अजिंठा घाटात तिहेरी अपघात : चारचाकीचा चुराडा, चौघे गंभीर जखमी
जामनेर : जगप्रसिद्ध अजिंठा घाटात शुक्रवारी (दि. २९) सकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून त्यामधील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने चारही प्रवासी तसेच ट्रॅव्हल बसमधील शेकडो प्रवासी बालंबाल बचावले आहेत.
घटनास्थळावरील माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील घाट उतरत असलेली चारचाकी (एमएच १९ एव्हाय ५६६) समोरून येणाऱ्या मालट्रकला (टीएन ३४ एझेड १२८५) पाहून थांबली होती. मात्र, त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव पुणे-जळगाव ट्रॅव्हल बसने (एमएच ०९ सिवी ६३९७) चारचाकीला जोरदार धडक दिली. बसने चारचाकीला फरफटत नेत रस्त्याकडील कठड्याला धडक दिल्याने बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली.
या अपघातात चारचाकीमधील प्रवासी भूषण रविंद्र पाटील (३५), शारदा भूषण पाटील (३५), शोभाबाई नवलसिंग पाटील (६५) व रत्नाकर श्रीराम पाटील (४२) सर्व रा. उधडी, ता. रावेर हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
ग्रामस्थांचा जीव तोडून प्रयत्न
धडकेनंतर चारचाकी दोन्ही वाहनांच्या मध्ये फसून चेंदामेंदा झाली होती. यावेळी प्रवासी व अजिंठा येथील ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गाडीचे पत्रे फाडून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
रहदारी विस्कळीत
अपघातानंतर घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, रामेश्वर इंगळे, पोहेकॉ राम आडे, विकास चौधरी, दिलीप तडवी, विजय पवार, बबन जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे याच वेळी महामार्गावरून जात असताना त्यांनीही घटनास्थळी थांबून मदतकार्यात सहभाग घेतला.