स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची मोठी खेळी
महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी उघडी दारे
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने जोरदार राजकीय रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीतील स्थानिक स्तरावरील प्रभावशाली नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने आपली दारे खुली केली असून, कोकण आणि ठाणे विभागातील अलीकडच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिवाळी संपल्यानंतर राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मतयंत्रांची उपलब्धता पाहता जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आयोगाच्या तयारीसोबतच सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. भाजपच्या विभागीय मेळाव्यांमध्ये पक्ष संघटनेची सद्यस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा, तसेच सरकारी पाठबळ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.
भाजपची रणनीती काय आहे?
सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, “भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना सामावून घ्या; परंतु या प्रक्रियेत आपल्या विद्यमान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.”
या निर्देशांमुळे पक्षविस्तारासोबतच जुन्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवण्यावर भाजपचा भर असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या या नव्या रणनीतीमुळे कोकण, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि सिंधुदुर्गसारख्या महत्त्वाच्या भागांत मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.