DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात

पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचार्‍यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणार्‍या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
नागपूर शहरात 60, गोंदियामध्ये 146, वर्धा येथे 30, भंडारा येथे 10 आणि चंद्रपूरमध्ये 95 अशा एकूण 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

सुविधा काळाची गरज
महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. असे मीटर वापरणे काळाची गरज आहे. देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांत स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.