सरपंच पती आणि मुलाला 24 जणांकडून मारहाण
पारोळा:– सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील पिंप्री प्र. उ. येथील महिला सरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील व 41 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्या घरी असताना मोठमोठ्याने आरडाओरड होत असल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता गावातील मारुती मंदिराच्या समोर त्यांचे पती रामकृष्ण गंभीर पाटील व मुलगा मयूर यांना गावातील प्लॉट भागातील संशयित आरोपी सुनील रामा पगारे, रामभाऊ चिंतामण भील, रणजीत मोतीलाल भील, राजू दादा भाऊ भील, विजय रवींद्र मालचे, राजू भिवसान भील, अजय नाना भिल, अविनाश नाना भिल गोपाल आबा भिल ,अजय दिलीप गायकवाड ,रोहित सिकंदरभिल , शैलेश भगवान पगारे ,विशाल पंडित भील , राहुल पंडित भील, प्रवीण पंडित भिल, अनिल रणजीत भिल ,भैय्या हिरामण पाटील ,संदीप महादू पगारे, पिंटू रोहिदास भिल, खंडेराव रामभाऊ भिल, शैलेश रामा पगारे ,अर्जुन रामा पगारे ,सचिन दयाराम पगारे ,सर्व रा. प्लॉट भाग यांनी एकत्र येऊन हातात लाट्या काठ्या व लोखंडी सळई आणि लोखंडी पाईपाने मारहाण करून शिवीगाळ करीत असल्याचा प्रकार दिसून आला.
त्यावेळी पुष्पा पाटील यांनी धाव घेऊन त्या ठिकाणी सुनील रामा पगारे हा त्यांच्या पती व मुलाला मारहाण करून तुमच्यामुळे आमचे सरपंच पद गेले असून आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे सांगत आज तुमचा काटा काढून टाकू असे बोलून लोखंडी पाईपने मुलगा मयूर याला तर पती यांच्या डोक्यावर आणि पोटावर मारून गंभीर दुखापत केली.
तसेच पुष्पा पाटील यांनी संशयितांना आवरण्याचा प्रयत्न केले असता इतर काही संशयित आरोपींनी मारुती मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या प्रमोद रामराव पाटील यांच्या घरात जबरदस्तीने घुसून प्रमोद पाटील व त्यांचा मुलगा प्रेम पाटील यांना घराबाहेर आणून जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. यावेळी प्रमोद पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांची साडी ओढून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी कृत्य केले. तसेच महिला सरपंचासह इतर महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी सरपंच पुष्पा पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग विसाव करीत आहे.