DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

असा विवाहसोहळा पाहिला नसेल, भारतीय संविधानाला मानलं साक्षी अन् बांधली लगीनगाठ

लाखनी (भंडारा)  : आजकाल विवाह सोहळ्यात अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकला वाटतं आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं, अविस्मरणीय व्हावं आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने त्या विवाहसोहळ्याची तयारी करत असतो. मात्र, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि त्यामुळेच या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

अलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्या जाते. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो. मात्र, ‘या’ विवाह सोहळ्यात असा प्रकार नव्हता तरीसुद्धा या विवाहसोहळ्याची चर्चा मात्र जोमात आहे. नेमकं या विवाहसोहळ्यात काय घडलं हे जाणून घेऊयात.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे झालेल्या या विवाह सोहळ्यात नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केली आणि उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं. लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरूणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पेशाने पत्रकार आहेत. पण विचाराने प्रगल्भ असलेल्या ‘या’ नवविवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला तसेच तो अमलातही आणला.

 

भारतीय संविधानाला साक्ष मानताना वर आणि वधू

सुरुवातीला गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात झाली. यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून दोघांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत या विचाराने जीवन जगण्याचा संकल्प केला.

 

विवाह सोहळ्याचं आणखी एक आकर्षण 

या विवाह सोहळ्याचं आणखी एक विशेष असं खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी व्ही. एस. कर्डक यांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात 4 डिसेंबर 1956 मध्ये एक पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हेपत्र सुद्ध यादोघांच्या वतीने याठिकाणी असलेल्या बुद्धविहाराला भेट म्हणून देण्यात आलं.

 

आदर्श विवाह सोहळ्याचं आकर्षण

दरम्यान, या विवाह सोहळ्याला बौध्द भिक्कू नाथ पुन्नो, बौध्द धम्माचे प्रचारक प्रा. सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच लग्न समारंभाचं सूत्रसंचालन निशा रामटेके (शेंडे) आणि प्रभाकर सोनडवले यांनी केलं. या विवाहसोहळ्याची विदर्भातच नव्हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच पंकज आणि आणि प्रांजल यांनी घेतलेल्या ज्या विचाराने विवाहसोहळा केला, त्यामुळे त्या दोघांचं खूप कौतुक होत आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.