DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गणेश चतुर्थी पूर्वी का केली जाते हरतालिका पूजा? जाणून घ्या महत्त्वं, व्रत, कथा…

दिव्यसार्थी ऑनलाईन : गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका व्रत करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रसोबत भारतात महिला मोठ्या उत्साहाने हे व्रत करतात.  हरतालिका या शब्दाची फोड ‘हरित’ म्हणजे ‘हरण’ करणे आणि ‘आलिका’ म्हणजे ‘आलिच्या’ मैत्रिणीच्या असा आहे. कुमारिका आणि विवाहित महिला हे व्रत करतात. या दिवशी महिला पार्वती मातेची पूजा करतात.

 

 

तिथी, मुहूर्त जाणून घ्या…!
यंदा 31 ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. म्हणजे गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी 30 ऑगस्टला मंगळवारी हरतालिका पूजा साजरी करण्यात येणार आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. तर 30 ऑगस्टला  सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

 

अशा प्रकारे करतात हरतालिका व्रत..!
या व्रताच्या वेळी देवघराजवळ चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई, शेवंती, पारिजातक, तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. यानंतर मनोभावे प्रार्थना करतात. पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी इत्यादी खेळ खेळतात.

 

पौराणिक कथा..!
पौराणिक अख्यायिकेनुसार, हिमालय पर्वतराजाची कन्या उपवर झाली तेव्हा नारदाने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचं ठरवलं. मात्र पार्वतीच्या मनात भगवान शंकर होते. पार्वतीने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला. जर माझं लग्न विष्णूसोबत केल्यास मी प्राणत्याग करेल, असा निरोप वडिलांना मिळाला. एवढंच नाही तर पार्वती घरातून पळून गेली आणि शिवप्राप्तीसाठी जंगलात कठोर तपस्या केली. जवळपास  12 वर्षे पार्वतीने तपस्या केल्यावर भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. पार्वतीच्या या तपाने आणि पूजेने शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्विकार केला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.